धाराशिवमध्ये ऐतिहासिक निर्णय!
बेकायदेशीर लिलावाद्वारे विक्री झालेल्या घराचा व्यवहार जिल्हा उपनिबंधकांनी ठरवला अवैध — कर्जदार वर्गात आनंदाची लाट
धाराशिव (प्रतिनिधी) : मनोज जाधव
धाराशिव तालुक्यातील मौजे रुईभर येथील दत्तात्रय बळीराम बारंगुळे यांच्या घराची जय तुळजाभवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक धाराशिव यांनी बेकायदेशीर लिलावाद्वारे केलेली विक्री जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव यांनी अवैध ठरवत कायम करण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील मनमानीपणे वसुली करणाऱ्या बँकांना चांगलाच धक्का बसला असून, कर्जदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
रुईभर येथील दत्तात्रय बळीराम बारंगुळे यांनी सन 2013 मध्ये घर बांधकामासाठी बारा लाख रुपयांचे कर्ज जय तुळजाभवानी अर्बन बँकेतून घेतले होते. त्यापैकी जवळपास साडेनऊ लाख रुपयांची परतफेड त्यांनी केली होती. मात्र काही हप्ते थकीत राहिल्याने बँकेने सन 2017 मध्ये दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालयात अर्ज दाखल करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 101 नुसार अकरा लाख 44 हजार 948 रुपयांच्या वसुलीसाठी प्रस्ताव सादर केला.
यानंतर 28 जानेवारी 2020 रोजी बँकेने लिलावाद्वारे सदर घर विक्रीस काढले, मात्र या प्रक्रियेदरम्यान कर्जदाराला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, तसेच घराचे बाजार मूल्यांकन व शासकीय मूल्यांकन यांचा विचारही करण्यात आला नव्हता.
कायदेशीर लढाई आणि निर्णय
कर्जदार दत्तात्रय बारंगुळे यांच्या वतीने अॅड. महेश विजयकुमार कोकाटे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव यांच्यासमोर कर्जदाराची बाजू मांडली. त्यांनी पुराव्यांसह दाखवून दिले की बँकेने केलेली लिलाव प्रक्रिया ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि नियमबाह्य होती. सर्व बाजू विचारात घेत, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव यांनी बँकेचा लिलाव अवैध ठरवत त्यास कायम करण्यास नकार दिला.
कर्जदार वर्गात समाधान
या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक कर्जदार वर्गात समाधानाची लाट उसळली असून, "कर्जफेडीमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या कर्जदारांच्या बाजूने न्याय मिळाल्याचे" मत विविध शेतकरी आणि नागरिकांनी व्यक्त केले आहे.
हा निर्णय धाराशिव जिल्ह्यातील बँकांच्या मनमानीवर लगाम घालणारा ऐतिहासिक निर्णय ठरत आहे.










0 टिप्पण्या