प्रतिनिधी ....मनोज जाधव
रुईभर (ता. धाराशिव) | दिनांक १८ मे २०२५ "छडी लागे छम छम, विद्या येई घम घम" या ओळी आज खऱ्या अर्थाने साकार झाल्या जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे, जिथे १९९६-९७ सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २८ वर्षांनंतर एकत्र आले आणि शालेय आठवणींना उजाळा दिला.
या गेट-टुगेदर कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने झाली. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या हस्ते "मानाची छडी" स्वीकारून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन तसेच राष्ट्रगीत करून कार्यक्रमाचा धार्मिक आणि संस्कारी प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि शिक्षण महर्षी श्री सुभाषदादा कोळगे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे त्या वेळचे सेक्रेटरी श्री विठ्ठल मामा पवार व १९९६-९७ च्या बॅचचे शिक्षक वर्ग—श्री. नाईकवाडी जी. एन., श्री. पडवळ एस. एल., श्री. सातपुते व्ही. पी., श्री. भोईटे ए. के., श्री. बांगर जी. डी., श्री. भोजगुडे एस. डी., श्री. शिंदे बी. बी., श्री. सुतार जी. एम., श्री. राऊत आर. जी. आणि श्री. पडवळ डी. ए.,श्री.रायजदे सर.,क्षीरसागर सर—हे मान्यवर उपस्थित होते.
त्या काळी इयत्ता १०वी अ, ब असे एकूण तीन वर्ग होते आणि विद्यार्थी संख्या १५० इतकी होती. आज ६० हून अधिक माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आले होते.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपली कार्यक्षेत्रातील प्रगती, कौटुंबिक माहिती, तसेच आपल्या शाळेच्या आठवणी सादर केल्या. काही शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांची भरभराट पाहून आनंदाश्रू लपवू शकले नाहीत. शिक्षकांच्या नजरेतून झळकणारा अभिमान आणि प्रेम, उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेला.
या गेट-टुगेदरची तयारी मागील तीन महिन्यांपासून सुरू होती. माजी विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून, विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुपवरून, एकत्र आले. २८ वर्षांपूर्वी मोबाईल क्रांती नुकतीच सुरू झाली होती आणि आज त्याच क्रांतीमुळे सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येऊ शकले.
गुरूजनांच्या हस्ते पुन्हा एकदा छडीचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थी भावविवश झाले. अनेकांनी जुने प्रसंग, शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेतील खेळ अशा आठवणींना उजाळा देत आपली मनोगते व्यक्त केली. खरे तर गुरूचे ऋण फेडता येत नाहीत मात्र त्यांचा सन्मान म्हणून प्रत्येक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू दिली गेली.
स्वर्गवासी झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना व वर्गातील जी मुले व मुली मयत झाली आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
हा गेट-टुगेदर केवळ एक सोहळा नव्हता, तर माजी विद्यार्थ्यांच्या मनात गुरूविषयी असलेल्या कृतज्ञतेचा व श्रद्धेचा अभिव्यक्ती सोहळा होता. शाळेतील आठवणींनी पुन्हा एकदा मने गहिवरली आणि मैत्रीची नवी नाळ पुन्हा घट्ट झाली.
0 टिप्पण्या