तुळजापूर यात्रा मैदान जमीन हडप प्रकरणी चौकशी अहवालास दिरंगाई
जबाबदार अधिकाऱ्यांवर सहआरोपी कारवाईची मागणी;आमदार सुरेश धस यांचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा
धाराशिव : तुळजापूर येथील ऐतिहासिक यात्रा मैदानाच्या जागेवर बोगस लेआउट करून जमीन हडप केल्याच्या गंभीर प्रकरणात गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अंतिम अहवाल अद्याप सादर न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.या दिरंगाईस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात यावी,अशी ठाम मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले आहे की,या प्रकरणात जाणूनबुजून उशीर होत असल्यास त्याचे सर्व परिणाम प्रशासनालाच भोगावे लागतील.तसेच,दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तुळजापूर नगर परिषदेने यात्रा मैदानासाठी सर्वे नंबर १३८ मधील २ हेक्टर ६३ आर इतकी जमीन संपादित केली होती.मात्र ही जमीन नियमबाह्यरीत्या हडप करून तिची विक्री केल्याची तक्रार संभाजी शिवाजीराव नेपते व किरण माणिकराव यादव यांनी प्रशासनाकडे केली होती.या तक्रारीनंतर तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीत नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार (सचिव), मंडळ अधिकारी अमर गांधले व तलाठी अशोक भातभागे हे सदस्य होते.या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला असला तरी त्यावर ठोस कारवाई न झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
तहसीलदार समितीच्या अहवालावर पुढील कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ७ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली होती.या समितीत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी ओंकार देशमुख (सचिव),उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शिरीष यादव (उपाध्यक्ष) तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख,जिल्हा सहनिबंधक,सहाय्यक नगर रचनाकार आणि उपायुक्त नगर परिषद प्रशासन त्रिंबक डेंगळे पाटील यांचा समावेश आहे.
मात्र या समितीने संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्यास सांगूनही काही अधिकाऱ्यांनी अद्याप अहवाल दिलेला नसल्याचे समोर आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून,यामुळे संपूर्ण चौकशी प्रक्रिया रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात बनावट रेखांकन नकाशे,नियमबाह्य अकृषी परवाने,बेकायदेशीर बांधकाम मंजुरी तसेच खरेदी-विक्रीचे बनावट व्यवहार झाल्याचे आरोप आहेत.यामध्ये तत्कालीन नगर परिषद,भूमी अभिलेख,मुद्रांक व नोंदणी विभागातील काही अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करून बोगस लेआउटसह संबंधित सर्व दस्तऐवज प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी,तसेच आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा,अशी स्पष्ट मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
तुळजापूरसारख्या धार्मिक व ऐतिहासिक शहरातील सार्वजनिक यात्रा मैदानाच्या जमिनीवर झालेल्या कथित गैरव्यवहारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेते,दोषींवर कठोर कारवाई होते की चौकशी अहवाल दिरंगाईतच अडकून राहतो,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या