Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सुट्टीच्या वेळीही माणुसकीला प्राधान्य! रात्री 10 वाजता धाराशिव तहसील व उपविभागीय कार्यालयाने दोन पोलीस भरती विद्यार्थ्यांचे स्वप्न वाचवले…”



        “सुट्टीच्या वेळीही माणुसकीला प्राधान्य! रात्री 10 वाजता धाराशिव तहसील व उपविभागीय कार्यालयाने दोन पोलीस भरती विद्यार्थ्यांचे स्वप्न वाचवले…”

धाराशिव :

सरकारी यंत्रणा सुट्टीच्या वेळेनंतर काम करत नाही… असा जनतेतला गैरसमज धाराशिव तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाने एका रात्रीत पुसून टाकला. माणुसकी, तत्परता आणि सेवाभावाचे जे उदाहरण घडले, त्याने दोन तरुणांची पोलीस होण्याची स्वप्ने अक्षरशः वाचली.


रुईभर येथील दिनेश बाळू चव्हाण याला पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी नॉन-क्रिमिनियर सर्टिफिकेट नव्हते. तर बेंबळी येथील ओमकार हनुमंत खापरे याला डोमिसाईल सर्टिफिकेट नसल्याने भरती प्रक्रियेत अडथळा होता. दोघांच्या मनात भीती… स्वप्न हातातून निसटण्याची.


ही अडचण रात्री ८ वाजता सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मनोज जाधव यांच्यापर्यंत पोहोचली. एकीकडे आकाश चव्हाण तर दुसरीकडे अजित रणदिवे यांनी मुलांची अडचण कळवली. वेळ रात्रीची… कार्यालये बंद… पण मनोज जाधव यांनी हार मानली नाही.


तात्काळ दोन्ही विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पावत्या त्यांनी धाराशिवचे तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्याकडे पाठवल्या. निवडणुकांच्या कामामुळे दिवसभर त्रस्त असतानाही, अत्यंत व्यस्त वेळापत्रक असूनही, मृणाल जाधव यांनी “विद्यार्थ्यांचे स्वप्न थांबू नये” या भावनेने तातडीने काम हाती घेतले.


रात्रीच्या उशिरा तहसील कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी कागदपत्रे धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडे पाठवली. सुट्टीची वेळ… रात्री 10 वाजले, पण देशमुख यांनी कोणतीही कुरकुर न करता दोन्ही सर्टिफिकेट्सना तात्काळ अप्रूव्हल दिले.


त्या क्षणी दोन्ही तरुणांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, डोळ्यांतील कृतज्ञता… हे दृश्य माणुसकीच्या खरी व्याख्या सांगणारे होते. आज ते दोघेही निर्भयपणे पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकले—फक्त अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे.


यासाठी मनोज जाधव यांनी धाराशिव उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार डॉ. सौ. मृणाल जाधव, नायब तहसीलदार विशाखा बलकवडे, तसेच सहकार्य करणारे ओम गावडे आणि अनुजा नितळीकर यांचे मनापासून आभार मानले.


आज धाराशिवमध्ये घडलेली ही घटना एक संदेश देऊन जाते—

“अधिकारी मनावर घेतले तर सामान्य नागरिकांची सेवा अशा पातळीवरही होऊ शकते!”

तहसील व उपविभागीय कार्यालयाने दाखवून दिले की, सरकारी पद म्हणजे केवळ सत्ता नव्हे… तर सेवेची संधी आहे.

महाराष्ट्रातील सर्व अधिकाऱ्यांसाठी हे एक प्रेरणादायी आदर्श उदाहरण ठरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या