पंचसूत्रीतून शहरविकास साधणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
भाजपाचा सर्वंकष वचननामा प्रकाशित
धाराशिव शहराच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या बाबींचा संकल्प केला आहे. शहरासाठी स्वतंत्र रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गुन्हेगारीला आळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ९ कोटी ८० लाख रुपये खर्चून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी वचननाम्यातील सर्व मुद्दे प्रामाणिकपणे. अंमलात आणले जाणार आहेतच मात्र याव्यतिरिक्त नागरिकांसाठी महत्वपूर्ण असलेले नवे, मोठे प्रकल्प आणि उपक्रमही आपण राबविणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल.
प्रतिष्ठान भवन येथे शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचा वचननामा आमदार पाटील व उपस्थितांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये घरोघरी जाऊन, नागरिकांशी बोलून, त्यांच्या अडचणी यापूर्वीच समजून घेतल्या आहेत. नागरिकांच्या या अडचणी, समस्यांवर काम करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यातीलच बाबींना आपण वचननाम्यात प्राधान्याने स्थान दिले आहे. वचननामामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच नागरिकांनी यापुढेही आणखी काही सूचना किंवा समस्या मांडल्या तर त्यावरही तत्परतेने काम करण्याचा आपला निर्धार असल्याचे आमदार पाटील यावेळी म्हणाले. धाराशिव नगरपालिकेवर यापूर्वी सत्ता भोगणाऱ्या विरोधकांमुळे शहरवासीयांना आज मुलभूत सुविधा मिळत नाहीत, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. देशात आणि राज्यात विकासाच्या माध्यमातून जनसेवा आणि जनतेचा महायुतीवर असलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी भाजपाकडून शहरविकासासाठी पंचसूत्री राबविली जाणार आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. धाराशिव शहरवासीयांना अपेक्षित असे लोकप्रतिनिधी देण्याचा संकल्प महायुतीने केलेला आहे. आजवर अनेक गैरसोयींना सामोरे जाणाऱ्या शहरवासीयांना आता यापुढे त्रास होवू नये यासाठी चांगले, सुशिक्षित उमेदवार महायुतीने दिलेले आहेत. पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, २४ तास पाणी पुरवठा, धुळमुक्त आणि खड्डेमुक्त प्रशस्त रस्ते, दररोज कचरा संकलन, विघटन आणि त्यावर प्रक्रिया, शिक्षण, आरोग्य व रोजगार निर्मितीवर भर या विकासाच्या पंचसूत्रीतून जनसेवा करण्याची संधी महायुतीला शहरवासीयांनी देणे आवश्यक आहे.
विरोधकांकडे शहराची सत्ता असताना झालेले कुप्रशासन आणि भ्रष्टकारभार हे शहराच्या आजच्या परिस्थितीला पूर्णपणे जबाबदार आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची महायुती हमी देत आहे. शहरातील प्रत्येक घरी जावून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अडीअडचणी समजूत घेत पुढील विकासाबाबत आपले म्हणणे देखील जाणून घेतले आहे. यावर काम करून शहराला अपेक्षित लोकप्रतिनिधी महायुतीने दिले आहेत. शहरवासीयांना शहराचा कायापालट करण्यासाठी ही संधी आहे. जास्तीत जास्त शहरवासीयांनी मतदान करावे आणि महायुतीची सत्ता नगरपालिकेवर आणावी, त्यानंतर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शहराचा कायापालट करण्याची जबाबदारी आपली राहील.या वचननाम्यात नमूद करण्यात आलेल्या बाबींपलीकडे आपण आणखी मोठे दोन प्रकल्प आपण हाती घेणार आहोत. धाराशिव शहराचा सर्वदूर आणि नियोजनबद्ध विकास व्हावा याउद्देशाने रिंगरोडची निर्मिती करण्याचे आपण निश्चित केले आहे. शहरातील सर्व भागांना तसेच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनादेखील जोडणारा असेल. भविष्यातील शहराची गरज पाहता तो नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. यासोबतच शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, व्यापक CCTV नेटवर्क उभारणे आणि त्यामाध्यमातून गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशाने देखील आपण प्रयत्न करणार आहोत. असेही आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अॅड. नितीन भोसले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे आदी उपस्थित होते.
विमानतळ हवाई धावपट्टी वाढविण्याचा निर्धार
धाराशिवजवळील विमानतळ मोठे आहे. येथील हवाई धावपट्टी साडेतीन किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा आपला निर्धार आहे. येत्या काळात विमानांच्या मेंटेनन्ससाठी याठिकाणी मोठी सुविधा निर्माण होऊ शकते. आपल्या भारत देशात पुढील काही काळात सुमारे १००० नवीन विमाने दाखल होणार आहेत. त्यांच्या पार्किंग व मेंटेनन्ससाठी देशभरातील अनेक विमानतळांची जागा भासणार आहे. त्यासाठी आपल्या विमानतळाचा परिसर अत्यंत सुयोग्य ठरेल असाच आहे. या प्रकल्पामुळे उद्योगवाढ, गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले.


0 टिप्पण्या