Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न शासन योजना अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांचे आवाहन....


       
          विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न

शासन योजना अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांचे आवाहन....


         प्रतिनिधी....मनोज जाधव 


धाराशिव | दि. १ मार्च — शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत तर त्या केवळ कागदोपत्री राहतात, असे प्रतिपादन शैलेश ब्रम्हे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथील लेडीज क्लब येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा अभिश्री देव या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील, तहसीलदार मृणाल जाधव तसेच जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अमोल वरुडकर उपस्थित होते.

“न्याय सर्वांसाठी” संकल्पनेचा पुनरुच्चार

मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती ब्रम्हे यांनी नागरिकांनी महाशिबिरात उभारलेल्या विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन शासनाच्या योजना, अभियान व उपक्रमांची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन केले. स्वतः लाभ घेण्याबरोबरच गावागावात योजनांची माहिती पोहोचवून इतरांनाही लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय संविधानाने सामाजिक व आर्थिक न्यायाची हमी दिली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार प्रत्येक नागरिकापर्यंत न्याय व शासन सेवा पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाचे कर्तव्य — लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोच

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मोफत कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे व शासन योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. शिबिरातून मिळालेली माहिती इतरांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ वाढवावा, असे त्यांनी आवाहन केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. अभिश्री देव यांनी हा कार्यक्रम लोकशाहीचा उत्सव असल्याचे सांगत, “न्याय सर्वांसाठी” या संकल्पनेतून विधी सेवा प्राधिकरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविण्यास कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

विविध योजनांचे प्रातिनिधिक वितरण

कार्यक्रमादरम्यान विविध शासकीय योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थी, महिला, शेतकरी व इतर लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, घरकुलाची चावी, प्रमाणपत्रे, कर्ज मंजुरी आदेश, शेळीगट वाटप, तृतीयपंथी ओळखपत्र तसेच विविध विभागांच्या योजनांचे लाभ प्रदान करण्यात आले.

महामेळाव्यात विविध विभागांनी माहितीपर स्टॉल उभारून नागरिकांना योजनांविषयी मार्गदर्शन केले. मान्यवरांनी स्टॉलना भेट देऊन योजनांची माहिती घेतली तसेच लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले.

वृक्षरोपांना जल अर्पणाने शुभारंभ

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपांना जल अर्पण करण्यात आले. महाशिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतलेल्या विविध विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्या. अभिश्री देव यांनी केले, संचालन न्या. सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन न्या. भाग्यश्री पाटील यांनी मानले. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, बचतगटातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या