रुईभर येथे भक्तीचा महोत्सव; श्री सिद्धिविनायक प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा
स्वखर्चातून मंदिर उभारणी; कीर्तन, सत्कार व महाप्रसादाने रंगणार भक्तिमय सोहळा.....
धाराशिव, दि. 10 (प्रतिनिधी): मनोज जाधव
रुईभर (ता. धाराशिव) गाव उद्या भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, श्री सिद्धिविनायक प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार (दि. 12) रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाच्या प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहनाने होणार असून, पुढे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांच्या हस्ते रुईभर व पंचक्रोशीतील संप्रदाय क्षेत्रात कार्य करणाऱ्या १०१ सेवेकऱ्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे.
याचबरोबर ह.भ.प. डॉ. ईश्वर महाराज कुंभार लिखित संत गोरोबा काका यांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथाचे प्रकाशन हा सोहळ्याचा आणखी एक आकर्षण ठरणार आहे. त्यानंतर ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांचे हृदयस्पर्शी हरी कीर्तन भक्तांना अध्यात्मिक उंचीवर नेईल.
विशेष म्हणजे, रुईभर गावात आजवर श्री सिद्धिविनायकाचे मंदिर नव्हते. ही उणीव लक्षात घेऊन डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाषदादा कोळगे यांनी स्वखर्चातून मंदिर उभारून एक प्रेरणादायी कार्य साकारले आहे. त्यांच्या या निस्वार्थ भावनेमुळे गावाला एक नवे आध्यात्मिक केंद्र लाभले आहे.
कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होणार असून, भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे. या पवित्र प्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री सुभाषदादा कोळगे यांनी केले आहे.
✨ भक्ती, सेवा आणि समर्पणाचा हा सुंदर संगम अनुभवण्यासाठी रुईभर उद्या सज्ज झाला आहे…!


0 टिप्पण्या