धाराशिव महसूल विभागाची क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेत दमदार कामगिरी; विविध प्रकारात यश
धाराशिव : छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ मध्ये धाराशिव महसूल विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटविला आहे. स्पर्धेतील विविध प्रकारांमध्ये विभागाने यश संपादन करून प्रशासनासोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट निवेदन या प्रकारात तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. सदर कार्यक्रमासाठी निवेदन व दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. तसेच निवेदनासाठी नायब तहसीलदार श्री. संतोष पाटील यांची मोलाची साथ लाभली.
शेतकरी, दिव्यांग बांधव, निराधार महिला तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या कामांना प्राधान्य देत धाराशिव महसूल विभागाने प्रशासनातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत समाजाभिमुख कार्याची परंपरा जोपासली आहे. विविध घटकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण करण्यावर भर देत नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श विभागाने निर्माण केला आहे.
जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी महसूल कर्मचाऱ्यांना योग्य दिशा देत प्रोत्साहन दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केले.
स्पर्धेतील वैयक्तिक नृत्य प्रकारात तेजश्री जगदाळे (धाराशिव) यांनी विभागात द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच “लखलख चंदेरी” या सामूहिक नृत्य सादरीकरणानेही द्वितीय क्रमांक पटकावला.
सदर यशामुळे धाराशिव महसूल विभागाचा गौरव वाढला असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे


0 टिप्पण्या