प्रतिनिधी ....मनोज जाधव
मुंबई...राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अखेर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी अधिकृतरित्या अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या नावाची निवड जवळपास निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून आघाडीवर होते. पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक अनुभवी, संघटनेशी नाळ जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पहिले जात होते. अखेर त्यांच्या अर्ज भरल्याने पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्वाच्या बदलाला अधिकृत मुहूर्त लागला आहे.
रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार असून, त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या माध्यमातून राज्यभरात प्रभावी कामगिरी केली आहे. संघटन कौशल्य, निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेला घनिष्ठ संपर्क ही त्यांच्या नेतृत्वाची ठळक वैशिष्ट्ये मानली जात आहेत.
भाजपचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीतील निर्णयप्रक्रियेत सहभागी असलेल्या वरिष्ठ मंडळींनी देखील चव्हाण यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या निवडीला आता केवळ औपचारिक घोषणा उरली असून, पक्षात त्यांच्या नेतृत्वाचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर होण्याची चिन्हे आहेत.
प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर झाल्यास आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपला नवे बळ मिळण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या