आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी वस्तूचा वापर करा – माजी जि.प. सदस्य रामदास अण्णा कोळगे
प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर : दि. 12 डिसेंबर – देशाची प्रगती साधायची असेल तर देशातील उत्पादनांना चालना देऊन स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवणे अत्यावश्यक आहे. स्वदेशी वस्तूंचा व्यापक वापर झाल्यास देशाचे उत्पन्न वाढेल आणि भारताला आत्मनिर्भर बनण्यापासून कोणतीही अडचण रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास अण्णा कोळगे यांनी केले.जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे आयोजित हुतात्मा दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “हुतात्मा बाबू गेनू सारख्या तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता विदेशी मालवाहू ट्रकसमोर उभे राहून बलिदान दिले.”
बाबू गेनू स्वातंत्र्याच्या लढ्यात तर सक्रिय होतेच, पण आपल्या कुटुंबाचा आधार म्हणून ते कापड गिरणीतही काम करत. दिवसा काम आणि रात्री स्वातंत्र्य आंदोलन यांचा समतोल साधत त्यांनी विदेशी वस्तूंच्या बहिष्कारासाठी तरुणांना प्रेरित केले.
“परदेशी वस्तूंवर बहिष्कार करून स्वदेशी वस्तू स्वीकारल्या तरच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत निर्माण होईल,” असे रामदास आण्णा कोळगे यांनी सांगितले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य जयप्रकाश कोळगे म्हणाले,
“अवघ्या १४ वर्षांच्या वयात बाबू गेनूंनी आंदोलनात सहभाग घेतला आणि विदेशी मालावरील ट्रकखाली झोकून देत हुतात्मा पत्करली. त्यांचा त्याग प्रत्येकाच्या मनात देशभक्तीचे बीज पेरणारा आहे. अशीच त्यागाची वृत्ती तरुणांनी अंगीकारली तर देशाची उन्नती निश्चित होईल.”
हुतात्मा दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते बाबू गेनू यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विद्यालयातील सहशिक्षक अभिषेक घोळवे यांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या जीवनपटाचे प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाला डॉ. आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे, माजी जि.प. सदस्य रामदास अण्णा कोळगे, माजी ग्रा.प. सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश शेटे यांनी केले, तर आभार श्री काकासाहेब डोंगरे यांनी मानले.


0 टिप्पण्या