जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या बनावट पीएचा सुळसुळाट , कामे मंजूर करण्यासाठी १२ ते १५ टक्के वसूल !, एका माजी आमदारासह दलालांनी कोट्यावधी लाटले ..
प्रतिनिधी...शहाजी आगळे
धाराशिव - जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी ज्या कामांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात येते, अशी कामे राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे स्वीय सहाय्यक व आणखी एकाने पीए असल्याचा बनाव करीत १२ ते १५ टक्के रक्कम उकळून दलालांनी आपले खिसे भरलेले आहेत. यामध्ये स्वीय सहाय्यक यांच्यासह एका माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छूक असलेला नेता तसेच एका बनावट स्वीय सहाय्यकांचा समावेश असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी पहिल्या बैठकीतच एक रुपयाही न घेता कामे करण्याचा संकल्प सोडला होता. मात्र त्यांच्या परस्परच माजी आमदारांसह कार्यकर्त्यांनी देखील माझे थेट पालकमंत्र्यांशी संबंध आहेत, अशी बतावणी करून अनेकांकडून कामांची यादी मागवून घेऊन त्या यादीतील कामांपोटी टक्केवारी (टोल) गोळा करून आपल्या खिशात घातला आहे हे विशेष. दि.७ एप्रिल रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्याने आपल्याला कामे निश्चित मंजूर करून मिळतील अशी आश्वासन देखील दिले आहे. त्यामुळे प्रमाणिक पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या बगलबच्चामुळे सरनाईक यांची नाहक बदनामी सुरु झाली आहे.
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पहिल्या बैठकीतच जिल्ह्याच्या विकास कामाला प्राधान्य देण्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे ही कामे करताना दर्जात्मक कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे त्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा एक पैसा कोणीही घेऊ नये अशी तंबी देखील दिली होती. मात्र, टक्केवारीत बरबटलेले, लाचार व मश्गुल झालेल्यांना त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ समजून देखील त्याकडे साफ दुर्लक्ष करून न समजल्याचे नाटक केले.
संबंधितानी जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय कोणत्या प्रकारची कामे आहेत ? याचा अहवाल कार्यकर्त्याकडून मागविला. तसेच माझे व पालकमंत्र्याचे डायरेक्ट संबंध आहेत, मीच साहेबांच्या खास मर्जीतला पी ए आहे, असे निर्लज्जपणे व बेधडक सांगून त्या कार्यकर्त्यांकडून टक्केवारी स्वरूपात चक्क १२ ते १५ टक्के रक्कम वसूल केली आहे. यामध्ये खुद्द स्वीय सहाय्यक यांचा देखील सहभाग असल्याची चर्चा आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून जर पीए टक्केवारी घेत असतील तर जिल्ह्याचा विकास होणार कसा ? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.
पालकमंत्री सरनाईक हे अतिशय दानशूर असून ते कुठल्याही प्रकारची टक्केवारी घेत नसल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र काही चांडाळ चौकटींनी पालकमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविली असल्याची थाप मारून त्यांची दुकानदारी सुरू केली आहे. कारण पालकमंत्री महिना दोन महिन्याला धाराशिवला येतात. त्यामुळे ते कोणालाही विचारू शकणार नाहीत, अशा अविर्भावामध्ये त्या मंडळींनी बेधडकपणे टक्केवारी घेतली आहे. कळस म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अडीचशे कोटी रुपयांची विकास कामे करण्यास मंजुरी देण्यात येईल. मात्र, या लाचार मंडळींनी हजार ते बाराशे कोटींच्या कामाची यादी तयार करून ठेवलेली आहे. विशेष म्हणजे तेवढ्याच रकमेची १२ ते १५ टक्केवारी संबंधितांकडून घेतली असून त्यांनी देखील डोळे झाकून आत्मविश्वासाने त्यांना ती रक्कम दलाल यांच्या हाती सोपविली आहे.
.......
टक्केवारी घेतलेल्यांपैकी काही मंडळी फरार !
मुख्यमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात येणाऱ्या कामांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे ज्यांनी टक्केवारीची रक्कम दिली ती मंडळी धास्तावलेली आहे. तर ज्यांनी टक्केवारी घेतलेली आहे त्यापैकी काहीजण फरार झाले आहेत. मात्र, टक्केवारीच्या रॅकेटमध्ये खुद्द पालकमंत्र्यांच्या स्विय सहाय्यकाचा सहभाग असल्याची उघड उघड चर्चा सुरू झाल्यामुळे दर्जात्मक विकास कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे टक्केवारीचा हा धंदा कोणाच्या माध्यमातून व कोणाच्या भरोशावर केला गेला ? हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
...........
पालकमंत्र्याच्या संपर्क कार्यालयात दलालांचा राबता
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील जिल्हा नियोजन समिती सभागृहाच्या तळमजल्यात संपर्क कार्यालय आहे. जिल्ह्यातील कामे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी केली जात असल्याचा अनेकांचा समज आहे. त्यामुळे अनेकजण पालकमंत्री नसताना देखील या कार्यालयात येतात. हीच संधी साधून या ठिकाणी टक्केवारी घेणारी मंडळी थांबून संबंधितांना कामांची यादी आणा असे फर्मान सोडतात. त्यामुळे या ठिकाणी कोणाकोणाचा राबता आहे ? याची चौकशी पालकमंत्र्यांनी केली तर ते स्पष्टपणे निदर्शनास दिसून येईल. कारण या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज असल्यामुळे सर्व सत्य सहजासहजी उघड होण्यास मदत होणार आहे.
0 टिप्पण्या