चिखली पंचायत समिती गणातून विकास गोरे रणसज्ज! आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी
प्रतिनिधी.....मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी धाव घेण्यास सुरुवात केली असून, त्यातच सांजा जिल्हा परिषद गटातील चिखली पंचायत समिती गणातील आरक्षण ओबीसी (पुरुष) या प्रवर्गासाठी सुटल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.
याच पार्श्वभूमीवर मेडसिंगा गावचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विकास गोरे यांनी आज आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली आहे.
गोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,
“जर पक्षाने संधी दिली तर मी ही निवडणूक लढवणार असून गोरगरीब जनतेसाठी, शेतकरी वर्गासाठी आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी झटणार आहे. जनतेचे सोने करणे हेच माझे ध्येय आहे.”
विकास गोरे हे मागील दहा वर्षांपासून आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या मागणीनेच भाजपच्या अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे.
आता पक्ष त्यांना उमेदवारी देतो का, आणि दिल्यास मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, विकास गोरे यांच्या हालचालींनी चिखली पंचायत समिती गणात नवा राजकीय रंग चढला आहे, हे नक्की.




0 टिप्पण्या