Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सांजा गटातून रमेश माने यांची उमेदवारीची ठोस मागणी; शिवसैनिक एकवटले, पक्षश्रेष्ठींसमोर ‘स्थानिक उमेदवार विरुद्ध आयात उमेदवार पेच


 सांजा गटातून रमेश माने यांची उमेदवारीची ठोस मागणी; शिवसैनिक एकवटले, पक्षश्रेष्ठींसमोर ‘स्थानिक उमेदवार  विरुद्ध आयात उमेदवार पेच


मेडशिंगा | प्रतिनिधी.    मनोज जाधव 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येक गटात उमेदवारी आपल्यालाच कशी मिळेल, यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर मेडशिंगा येथील  रमेश माने यांनी आज चिखली येथे झालेल्या सांजा जिल्हा परिषद गटाच्या बैठकीत पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलासदादा बाळासाहेब घाडगे पाटील यांच्याकडे आपल्या उमेदवारीची अधिकृत मागणी केली.

रमेश माने हे यापूर्वी मेडशिंगा ग्रामपंचायतीचे सदस्य राहिले असून, त्यांच्या कार्यकाळात सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रभावी काम केले आहे. रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा आणि सामाजिक सलोखा या बाबींवर त्यांनी दिलेल्या भरामुळे गावात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. याच कामाची पावती म्हणून गावातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी एकत्र येत ‘उमेदवारी रमेश मानेंनाच द्या’ अशी ठाम मागणी पक्षाकडे करत असल्याचे समजते.

सांजा जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच गटातून यापूर्वी झालेल्या निवडणुकीत विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा आमदार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील निवडून गेले असल्याने या मतदारसंघात शिवसेनेची मजबूत पकड आहे. त्यामुळे या गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचेही स्पष्ट होत आहे.

मात्र आतापर्यंत या मतदारसंघातून बाहेरून ‘आयात’ केलेले उमेदवार निवडून गेल्याची नाराजी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. यावेळी मात्र “उमेदवारी ही मतदारसंघातीलच, गावातल्या भूमिपुत्रालाच मिळाली पाहिजे” अशी जोरदार मागणी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरल्याने नेतृत्वापुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

बाहेरचा उमेदवार द्यायचा की स्थानिक कार्यकर्त्याला संधी द्यायची, हा प्रश्न सध्या पक्ष नेतृत्वासमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, रमेश माने यांच्या उमेदवारीच्या मागणीवेळी मेडशिंगा गावातील बहुसंख्य शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, हे विशेष. त्यामुळे आता शिवसेना मेडशिंगाच्या भूमिपुत्रावर विश्वास दाखवणार का, याकडे संपूर्ण सांजा गटाचे लक्ष लागले आहे.

पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावरच या बालेकिल्ल्यातील पुढील राजकीय गणित ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या