*नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाचा संवेदनशील झंझावात; १२ मतिमंद मुलींना तात्काळ जन्मदाखले*
— धाराशिव तहसीलची निर्णायक कारवाई!
कागदपत्रांच्या अडचणीत अडकलेल्या विशेष मुलींना दिलासा; स्वाधार शाळेत ऐतिहासिक सुनावणी
धाराशिव | प्रतिनिधी....मनोज जाधव
नूतन वर्ष २०२६ च्या पहिल्याच दिवशी धाराशिव तहसील प्रशासनाने सामाजिक न्यायाचा ठोस आणि ठाम संदेश देत स्वाधार मतिमंद मुलींची शाळा, आळणी येथे १२ मतिमंद (Special Children) मुलींच्या जन्मदाखल्यांचे प्रलंबित प्रश्न जागेवरच निकाली काढले. वर्षानुवर्षे कागदपत्रांच्या जंजाळात अडकलेल्या या विशेष मुलींना अखेर प्रशासनाच्या थेट हस्तक्षेपामुळे हक्काचा जन्मदाखला मिळाला.
दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित मुलींच्या सामुदायिक वाढदिवसाच्या कार्यक्रमातच तहसील कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली. कोणताही विलंब, फेऱ्या किंवा दिरंगाई न करता तात्काळ आदेश पारित करून जन्मदाखल्यांचे वितरण करण्यात आले. हा निर्णय प्रशासनाच्या कार्यक्षमतेसह सामाजिक संवेदनशीलतेचा ठळक नमुना ठरला आहे.
जन्मदाखला नसल्याने शिक्षण, आरोग्यसेवा, अपंगत्व प्रमाणपत्र, शासकीय योजना व मूलभूत हक्कांपासून वंचित राहणाऱ्या या मुलींसाठी हा निर्णय नवजीवन देणारा ठरला. विशेष गरजा असलेल्या मुलींना प्रशासनाने थेट त्यांच्या ठिकाणी जाऊन न्याय दिल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक उपक्रमास माननीय खासदार श्री. ओमराजे निंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव माननीय भाग्यश्री पाटील मॅडम, धाराशिवच्या तहसीलदार माननीय मृणाल मॅडम तसेच नायब तहसीलदार माननीय बलकवडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी प्रशासनाच्या या कृतीचे कौतुक करत विशेष मुलांच्या हक्कांसाठी शासनाची भूमिका अधिक ठाम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात मुलींचा सामुदायिक वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. केक कापत नववर्षाचे स्वागत करताना मुलींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा प्रशासनाच्या कामाची खरी पावती ठरला. केवळ फाइल्सपुरती मर्यादित न राहता थेट मैदानात उतरून निर्णय घेणारे प्रशासन आजच्या उपक्रमातून समोर आले.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी असा लोकाभिमुख, मानवी दृष्टिकोनातून घेतलेला ठोस निर्णय झाल्याने धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



0 टिप्पण्या