सांजा गटात वंचित बहुजन आघाडीचा तरुण चेहरा पुढे; अशोक कांबळेंची जिल्हा परिषद उमेदवारीसाठी तयारी
धाराशिव | प्रतिनिधी. मनोज जाधव
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील सांजा जिल्हा परिषद गटात वंचित बहुजन आघाडीने ताकद दाखवण्याची तयारी सुरू केली असून, पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा युवक तालुका उपाध्यक्ष अशोक कांबळे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दर्शवली आहे.
वंचित बहुजन आघाडीने निवडणुका स्वबळावर आणि आक्रमक पद्धतीने लढवण्याचा निर्धार केला असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांजा गटात अशोक कांबळे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मेडसिंगा येथील सामान्य कुटुंबातून पुढे आलेले अशोक कांबळे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, पक्षावरील निष्ठा, सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि युवकांमधील प्रभावी संपर्कामुळे मोठा जनसमर्थन मिळताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी गावागावात काम केले असून, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
स्थानिक उमेदवार म्हणून सांजा गटातील प्रत्येक गावातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी, आरोग्य सुविधा व शिक्षणाशी संबंधित प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. सुशिक्षित, तरुण आणि थेट जनतेशी संवाद साधणारा नेता अशी त्यांची ओळख असून, दांडगा जनसंपर्क हे त्यांचे प्रमुख बलस्थान मानले जात आहे.
“सामान्य माणसाचे प्रश्न जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवायचे आहेत. विकासासाठी प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे काम करणे हेच माझे ध्येय आहे,” असे अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण असून, सांजा गटात पक्षाला एक सक्षम, तरुण आणि विश्वासार्ह पर्याय मिळाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. आगामी निवडणुकीत सांजा गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता अशोक कांबळे यांच्या उमेदवारीत असल्याचे बोलले जात आहे.


0 टिप्पण्या