चिवरी गणात शिवसेनेचा निष्ठावंत चेहरा पुढे; मल्लिनाथ आप्पा सारणेंची उमेदवारीसाठी जोरदार मागणी
तुळजापूर | प्रतिनिधी. मनोज जाधव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच धाराशिव जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांकडून आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील अनदुर जिल्हा परिषद गटातील चिवरी पंचायत समिती गणातून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व शाखाप्रमुख मल्लिनाथ आप्पा सारणे यांनी उमेदवारीची अधिकृत मागणी नोंदवली असून, त्यामुळे पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले मल्लिनाथ आप्पा सारणे यांनी शाखाप्रमुख म्हणून काम करताना पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी इमानेइतबारे व प्रामाणिकपणे पार पाडली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला असून, तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत शिवसेनेची विचारधारा समाजकारणातून पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे.
अनदुर येथे झालेल्या गट बैठकीत त्यांनी आपल्या उमेदवारीची मागणी ठामपणे मांडली. या बैठकीस जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा बाळासाहेब घाडगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सारणे यांनी, “पक्षाने संधी दिली तर मी निश्चितपणे विजयी होऊन दाखवेन. माझ्या आतापर्यंतच्या कार्याच्या जोरावरच ही प्रबळ दावेदारी मांडत आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आपली भूमिका मांडली.
मल्लिनाथ आप्पा सारणे यांचे दीर्घकाळाचे संघटनात्मक योगदान, व्यापक जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवरील पकड पाहता, चिवरी गणात ते एक मजबूत व विश्वासार्ह उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यांच्या उमेदवारीच्या मागणीमुळे पक्षश्रेष्ठींसमोरही विचारमंथन वाढले असून, तिकीट कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, सारणे यांना उमेदवारी मिळाल्यास ते समोरच्या उमेदवारास मोठे व तगडे आव्हान उभे करू शकतात, हे मात्र राजकीय जाणकार मान्य करत आहेत. सध्या तरी त्यांच्या उमेदवारीने चिवरी गणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, येणाऱ्या काळात पक्षाचे राजकीय गणित कोणत्या दिशेने वळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


0 टिप्पण्या