🔶
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिवतर्फे भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
धाराशिव | प्रतिनिधी...मनोज जाधव 9823751412
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटली की महाराष्ट्रात आदर्श निर्माण करणारा उत्सव सर्वप्रथम धाराशिव शहरात पाहायला मिळतो. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धाराशिव यांच्या वतीने दरवर्षी शिवजयंती महोत्सवाचे अत्यंत नियोजनबद्ध व समाजोपयोगी स्वरूपात आयोजन करण्यात येते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांना उपयुक्त ठरणारे लोकोपयोगी, समाजहिताचे उपक्रम या समितीच्या माध्यमातून राबविले जातात.
सन 2026 मधील 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने समितीने यंदा एक अत्यंत उल्लेखनीय व समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतला आहे. मागील काळात धाराशिव जिल्हा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला असून अनेक सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत मुला-मुलींचे विवाह करणे अनेकांना अशक्य झाले आहे.
ही सामाजिक वेदना ओळखून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धाराशिव यांनी जनसेवेच्या भावनेतून भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विवाह सोहळा सर्व धर्मीय असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक, लोककल्याणकारी विचारांना साक्ष देणारा उपक्रम ठरणार आहे. आजवर समितीने केलेल्या सामाजिक कार्यांपैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा व ऐतिहासिक घटक मानला जात आहे.
हा सामुदायिक विवाह सोहळा दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी
स्थळ : जिल्हा परिषद कन्या प्रशाला, धाराशिव
येथे संपन्न होणार आहे.
या विवाह सोहळ्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख 15 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली असून गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत शहरातील दर्शनी भागात आकर्षक डिजिटल फलक लावूनही जनजागृती करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरजूंना दिलासा देणारा हा उपक्रम धाराशिव जिल्ह्यातील समाजबांधवांकडून विशेष कौतुकास पात्र ठरत असून या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



0 टिप्पण्या