वाढदिवसातून निसर्ग व शिक्षणाचा संदेश – सहशिक्षक विजय फरताडे सरांचा आदर्श उपक्रम
धाराशिव | प्रतिनिधी. मनोज कुमार
धाराशिव तालुक्यातील मौजे मेडशिंगा येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक विजय फरताडे सर यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त केवळ केक कापण्यापुरता मर्यादित न राहता समाजासाठी प्रेरणादायी असा आगळावेगळा उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने फरताडे सरांनी शाळेला ५० झाडांची भेट देत शाळेच्या परिसरात प्रत्यक्ष ५० झाडांची लागवड केली. त्याचबरोबर शालेय वाचनालयासाठी उपयुक्त पुस्तके भेट दिली, तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून आपला आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.
गुरुजनांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी कार्यातून साजरा करावा, हा संदेश देणारा हा उपक्रम ठरला. विद्याधानाचे पवित्र कार्य फरताडे सर आजवर सातत्याने करत आले आहेत; मात्र या वाढदिवसातून त्यांनी शिक्षणासोबतच निसर्गसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला.
“निसर्गाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” हा संदेश देत त्यांनी स्वतः वृक्षलागवड करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनीही निसर्गाप्रती आपली भूमिका कशी असावी, याचा जिवंत धडा या उपक्रमातून मिळाला. निसर्ग आपल्या आयुष्यात किती आवश्यक आहे, हे त्यांनी कृतीतून शिकवले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बांधव तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शाळेच्या परिसरात फुललेली हिरवळ, हा वाढदिवस अधिकच अर्थपूर्ण करत होती.
विजय फरताडे सरांचा हा वाढदिवस निसर्ग, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा संगम ठरून अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.





0 टिप्पण्या