समाजवादी विचारांचा आधारवड हरपला : शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे
प्रतिनिधी....मनोज जाधव
रुईभर, दि. ३ डिसेंबर – समाजवादी विचारांचे ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे एक भक्कम स्तंभ हरपल्याची भावना डॉ. आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे यांनी व्यक्त केली. जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे आयोजित भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पन्नालाल सुराणा यांच्यासोबत स्वातंत्र्यसेनानी कै. विश्वनाथ आबा कोळगे आणि कै. दादाराव भाऊ कोळगे यांनी समाजवादी विचारांची वाटचाल एकत्रितपणे पुढे नेली. १९७९ साली रुईभर येथे डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेच्या स्थापनेतही त्यांचे मोलाचे योगदान राहिले. “शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मला ज्येष्ठ पन्नालाल सुराणा आणि बापूसाहेब काळदाते यांनी दिली. त्यांच्या महान कार्याची पोकळी भविष्यात भरून निघणे कठीण आहे. खरोखरच समाजवादी विचारांचा आधारवड हरपला,” असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, पन्नालाल सुराणा हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील आसू गावचे रहिवासी होते. शालेय जीवनातच ते राष्ट्रसेवा दलात सहभागी झाले. बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या सहवासात सर्वोदय आश्रमात राहून त्यांनी भूदान चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. राजकीय, आर्थिक आणि वैज्ञानिक विषयांवरील तब्बल ४० पुस्तके त्यांनी लिहिली असून १९९३ च्या भूकंपग्रस्तांसाठी केलेले त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. सामाजिक कार्यात ते आयुष्यभर सक्रिय राहिले.
माजी जि. प. सदस्य रामदास आण्णा कोळगे यांनीही श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, पन्नालाल सुराणा रुईभरला वारंवार भेट देत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहत. राष्ट्रसेवा दल मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. “विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सेवाधारी बनावे; राष्ट्र विद्यार्थ्यांच्या बळावर उभे आहे,” ही त्यांची ठाम धारणा होती. स्वतःच्या वेदना लपवून समाज आणि विद्यार्थी हितासाठी ते नेहमीच लढत राहिले, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थितांनी पन्नालाल सुराणा यांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी माजी जि. प. सदस्य रामदास कोळगे, माजी ग्रा. प. सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश शेटे यांनी केले, तर श्री. सचिन कांबळे यांनी आभार मानले....


0 टिप्पण्या