तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांची लूट; शासकीय पावती असूनही खासगी पार्किंगची सक्तीने वसुली!
तुळजापूर (प्रतिनिधी) – श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूरमध्ये येत असतात. मात्र या भाविकांची श्रीमंत भाविक नव्हे तर लुटलेली भाविक अशी स्थिती झाली आहे. शासकीय पार्किंगसाठी अधिकृत पावती फाडण्यात आलेली असूनही भाविकांकडून खासगी पार्किंग चालकांकडून जबरदस्तीने पुन्हा पैसे वसूल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भाविकांना वाहन उभे करण्यासाठी शासकीय पार्किंगची सुविधा असल्याची पावती त्यांच्या हातात असतानाही काही खासगी पार्किंग चालकांकडून ‘ही पावती येथे चालत नाही’ असे सांगत सक्तीने रक्कम वसूल केली जात आहे. यामुळे भाविकांत संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी सोशल मिडियावर व्हिडीओ व फोटो शेअर करून आपल्या नाराजीचा सूर व्यक्त केला आहे..
तुळजापूर हे महाराष्ट्राचे एक प्रमुख श्रद्धास्थान असून लाखो भाविकांचे आस्था स्थान आहे. मात्र येथेच अशा प्रकारे भाविकांची लूट होत असेल, तर यामुळे तुळजापूरच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
या प्रकाराकडे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष व विद्यमान जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ही लूट थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील का, असा प्रश्न भाविकांमध्ये उपस्थित होत आहे.
वसुली साठी वापरण्यात येणारे पावती बुक
स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविक आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
0 टिप्पण्या