येडशी येथे सामाजिक कार्यकर्त्यांचा वनअधिकाऱ्यांविरोधात अनोखा निषेध
प्रतिनिधी...शहाजी आगळे
येडशी : धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी येडशी येथील वनअधिकारी यांना 14 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन इशारा दिला होता की, पुढील सात दिवसांत वाघाला पकडण्यात आले नाही, तर वनअधिकाऱ्यांना कागदी वाघ भेट दिला जाईल. या इशाऱ्याच्या अनुषंगाने आज मनोज जाधव यांनी वनअधिकारी कार्यालयात जाऊन आपला शब्द पाळला.
मात्र, कार्यालयात पोहोचल्यावर त्यांना एक धक्कादायक अनुभव आला. वनअधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते. त्यामुळे, मनोज जाधव यांनी कागदी वाघ थेट रिकाम्या खुर्चीला भेट दिला आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा तीव्र निषेध व्यक्त केला.
या घटनेवर भाष्य करताना मनोज जाधव म्हणाले, "वनविभागाच्या निष्क्रीयतेमुळे येडशी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, मात्र वनविभाग योग्य ती उपाययोजना करत नाही. त्यामुळे आम्ही निवेदन दिले होते. परंतु, आज आम्हाला अधिकारीच अनुपस्थित आढळले. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे."
तसेच, त्यांनी पुढे इशारा दिला की, "जर पुढील काही दिवसांत वाघाला पकडण्यात यश आले नाही, तर आम्ही उपविभागीय वनाधिकारी यांना बेशरमाचे झाड भेट देऊ. ही भेट म्हणजे त्यांच्या निष्काळजीपणाचा निषेध दर्शवणारी असेल."
येडशी परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर संतापाचे वातावरण आहे. लोकांनी वनविभागाच्या निष्क्रीयतेवर नाराजी व्यक्त केली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि वनविभाग यांना त्वरीत उपाययोजना करावी लागेल, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
वनविभागाच्या या निष्काळजीपणावर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे.
0 टिप्पण्या