गौतमीचा दादा !
गौतमीने "I love you" म्हणताच ७० फूट उंचीवरील झाडावरचा दादा खाली उतरला .
धाराशिव- जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे ग्रामदैवत नृसिंह यात्रेनिमित्त गुढी पाडव्याच्या दिवशी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी झाली. मात्र, या कार्यक्रमात एक अनोखा प्रसंग घडला, ज्याची चर्चा संपूर्ण गावभर रंगली आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या एका तरुणाने चक्क ७० फूट उंच झाडावर चढून गौतमी पाटीलचा नृत्याविष्कार पाहण्याचा निर्णय घेतला. अंधारात टॉर्चच्या मदतीने तो कार्यक्रमाचा आनंद घेत होता. हा प्रकार गौतमीच्या नजरेस पडताच तिने आपल्या नृत्याचा काही वेळासाठी ब्रेक घेतला आणि त्या तरुणाला उद्देशून "दादा, आय लव यू, खाली ये!" असे प्रेमळ आवाहन केले. गौतमीच्या या अनपेक्षित शब्दांनी संपूर्ण कार्यक्रमस्थळी काही क्षणांसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, गौतमीच्या आवाहनामुळे तरुणाने कोणताही धोका न घेता झाडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. या प्रसंगाने उपस्थित प्रेक्षकांमध्ये आनंद आणि कौतुकाची लाट उसळली. गौतमी पाटीलचे कार्यक्रम नेहमीच चर्चेत राहतात, मात्र या प्रसंगामुळे हिप्परगा रवा येथील कार्यक्रमाची आठवण सर्वांनाच कायमस्वरूपी लक्षात राहील. तिच्या एका वाक्याने एका तरुणाचा थरारक निर्णय बदलला, ही घटना विशेष लक्षवेधी ठरली आहे.
0 टिप्पण्या