उत्सव समतेचा – लिंगसमानतेचा प्रेरणादायी जागर बरमगावात साजरा
150 हून अधिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; श्रम, आरोग्य व शिक्षणाचा समन्वय
बरमगाव (बु.), ता. धाराशिव : “मुलगा असो वा मुलगी – समानतेची नजर हवी!” या घोषवाक्याला प्रत्यक्षात उतरवणारा ‘उत्सव समतेचा’ हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा, बरमगाव (बु.) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. १ मे रोजी कामगार दिनाचे औचित्य साधत आयोजित या कार्यक्रमात लिंगभेदविरहित समाजासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढाकार घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत-राज्यगीत गायनाने वातावरण राष्ट्रभक्तीने भारून गेले. शाळेचे शिक्षक विजयकुमार फरताडे यांनी विविध उपक्रमांची प्रभावी मांडणी केली. स्वागतगीताने सूर मारत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या घोषवाक्यांमधून आणि अनुभव कथनांमधून लिंगसमानतेचा संदेश ठळकपणे पोहोचवण्यात आला. “मुलगा रडला तर तो कमजोर का?” यासारखे प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांनी रूढ सामाजिक चौकटींना धक्का दिला.
या दिवशी शाळेच्या वार्षिक निकालाचेही वितरण करण्यात आले. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येताच पालक आणि ग्रामस्थांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले.
कार्यक्रमाला सरपंच शोभाताई गोरे, उपसरपंच पोपट ढवळे, माजी सैनिक चांगदेव घोडके, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बळीराम सिरसाठे, ग्रामसमृद्धी संस्थेचे अध्यक्ष अमर आगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम कोरो इंडिया, जिल्हा परिषद आणि यूनिसेफ यांच्या संयुक्त पुढाकारातून घेण्यात आला. प्रेरक विद्या आकुस्कर व सपना ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मीना-राजू मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
‘उत्सव समतेचा’ हा केवळ एक कार्यक्रम नसून लिंगभेदाच्या भिंती पाडण्यासाठी केलेले प्रयत्नांचे प्रारंभिक पाऊल असल्याचे आयोजकांनी सांगितले. “विचार बदला, समाज बदलेल” हा संदेश घेऊन बरमगावने या दिवशी परिवर्तनाची दिशा दाखवली.
0 टिप्पण्या