Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिवच्या बलस्थानचा वापर विकासासाठी योग्य पद्धतीने होत आहे


    प्रतिनिधी....मनोज जाधव 


 स्वच्छ हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश ही धाराशिव जिल्ह्याची ओळख आहे. बालाघाट डोंगररांगांवर वसलेल्या धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक आणि नैसर्गिक बलस्थाने खऱ्या अर्थाने आता राष्ट्रीय पटलावर ठळकपणे येताना दिसत आहेत. बालाघाट डोंगरांगांच्या घाटमाथ्यावरून वाहणारे वारे या जिल्ह्याची कधीच न संपणारी ऊर्जा आहे. जिल्ह्याच्या विकासाला नवनवे आयाम देणारी अफाट ताकद आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या धाराशिव जिल्ह्याला शेजारील सोलापूर आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यांच्या तुलनेत मिळालेले हे नैसर्गिक वरदान हक्काच्या रोजगाराची अनेक तावदाने उघडून देणारे आहे. घाटमाथ्यावरुन वर्षातील बाराही महिने घोंगावत असलेला हा वारा जिल्ह्याची अक्षय ऊर्जा आहे असे जर दोन दशकापूर्वी कोणी म्हटले असते, तर त्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. मात्र आजच्या घडीला जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा लौकिकास्पद तुरा खोवण्याचं काम हाच वारा करीत आहे. बालाघाट पर्वतरांगांच्या अंगाखांद्यावर मोठ्या दिमाखात फिरणारे हे पवन ऊर्जेचे पंखे त्याचीच तर साक्ष देत आहेत.


धाराशिव जिल्ह्यातील कळंब, भूम आणि वाशी या तालुक्याच्याच ठिकाणी नाही तर तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि धाराशिव तालुक्यातही अनेक ठिकाणी पवन ऊर्जा निर्मितीचे पंखे मोठ्या वेगात फिरू लागले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढावी यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरही खूप सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने निर्धारित करण्यात आलेल्या हरित ऊर्जा निर्मितीला गती देण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम आणि ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी हे प्रकल्प आणखी वेगात कार्यान्वित होणे अत्यंत निकडीचे आहे. सर्वसामान्य नागरिकांनी यामागे केंद्र आणि राज्य सरकारची असलेली उदात्त भावना जाणून घेऊन आवश्यक त्या ठिकाणी सकारात्मक पध्दतीने सहकार्य केल्यास जिल्ह्यातील हे महत्वपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होतील. ऊर्जा मंत्रालयाने अधोरेखित केलेली उद्दिष्टपूर्तता गाठण्यात जर आपण धाराशिव जिल्हा म्हणून यशस्वी झालो तर रिन्यूएबल एनर्जी निर्मितीच्या पटलावर धाराशिव जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात नावाजला जाईल यात जराही दुमत नाही. पर्यावरणीय आणि हवामान बदल या विषयावर आता सबंध जगभरात मंथन सुरू आहे. त्या अनुषंगाने भारतातही हरित उर्जा क्षेत्राला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्याला या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. आणि राज्यात धाराशीव जिल्हा भविष्यात आघाडीवर असणार आहे. त्यामुळे भविष्यात हरित उर्जा क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधीचा लाभ स्थानिक तरूणांनाही साहजिकच मिळणार आहे. या क्षेत्रातील कौशल्य विकसीत करून त्या संबधीचे महत्वपूर्ण ज्ञान घेतल्यास स्थानिक आणि होतकरू तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी सहज उपलब्ध होणार आहेत. त्याचा सकारात्मक श्रीगणेशाही जिल्ह्यात सुरू झाला आहे.


जिल्हा प्रशासन आणि  सेरेंटिका रिन्यूएबल्स यांच्या पुढाकारातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी यांच्या सहकार्याने वाशी तालूक्यातील २० तरूणांना नुकतेच इलेक्ट्रिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते त्या सर्व युवकांना प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले आहे. आता या सर्व प्रशिक्षित युवकांवर पवनऊर्जा निर्मिती प्रकल्पातील छोट्या मोठ्या मेंटेनन्सची कामे सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने स्वतःच्या गावाजवळ हक्काचा कायमस्वरूपी रोजगार या माध्यमातून या युवकांना लाभणार आहे. सेरेंटिका रिन्यूएबल्स या संस्थेने घेतलेला हा पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. त्यातून प्रेरणा घेऊन अन्य संस्थादेखील स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने नक्की सकारात्मक विचार करतील अशी आशा आहे. भविष्यात धाराशीव जिल्हा हरित उर्जेचे हब बनू पाहत आहे. हरित उर्जा क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधी या स्थानिकांना मिळाव्यात या हेतूने जिल्हा प्रशासन विविध कंपन्यांना प्रोत्साहित करून कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेईल. भविष्यकाळात उपलब्ध होणारे रोजगार हे स्थानिक तरूणांना मिळावेत यासाठी आवश्यक असणारे प्राथमिक शिक्षण व प्रशिक्षण उपक्रमही राबविण्यात येतील. जेणेकरून  धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या प्रकल्पाबद्दल अधिक उत्साही आणि आदरयुक्त जनभावना तयार होईल. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सर स्वतः याबाबत खूप आग्रही आणि सकारात्मक आहेत. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा प्रशासन अतिशय काटेकोरपणे धाराशिव जिल्ह्याची ही नवी आणि अभिमानास्पद ओळख ठळकपणे देशाच्या पटलावर अधोरेखित करण्यासाठी या सर्व कंपन्यांना केंद्र आणि सरकारने दिलेल्या निर्देशानुसार सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत.


पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी, देखभाल आणि दुरुस्तीसाठी कुशल आणि अकुशल कामगारांची सतत गरज भासते. त्यामुळे स्थानिक तरुणांना अनुषंगिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास स्थानिक रोजगाराच्या संधी अगदी सहजपणे या प्रकल्पातून उपलब्ध होऊ शकतात. धाराशिव जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत हे करूनही दाखवले आहे. या प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी स्थानिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांच्याठायी असलेल्या अंगभूत कौशल्ये वाढीस लागली आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या स्वतःच्या गावाजवळ चांगले उत्पन्नही मिळत आहे. पवन ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक व्यवसाय आणि उद्योगांनाही चालना मिळताना दिसून येत आहे. पवन ऊर्जा प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कर भरणा करतात. ज्यामुळे स्थानिक भागाच्या विकासासाठी अधिक निधी उपलब्ध होतो आहे. पवन ऊर्जा प्रकल्पामुळे ग्रामीण भागांमध्ये विकासालाही एक सातत्यपूर्ण चालना मिळताना पाहायला मिळत आहे. कारण या प्रकल्पांमुळे नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेतच त्याचबरोबर लोकांचे जीवनमान उंचावताना दिसत आहे. पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्त्रोत आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तुलनेने खूप कमी होतो आणि पर्यावरणाची काळजीही घेतली जाते. भारतात, पवन ऊर्जा प्रकल्पामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे. महाराष्ट्रातील चाळकेवाडी येथील पवन ऊर्जा प्रकल्पानेही स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. पवन ऊर्जा निर्मितीमुळे केवळ ऊर्जाच मिळत नाही, तर स्थानिक लोकांना रोजगार आणि आर्थिक विकास साधता येतो, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते. धाराशिव जिल्ह्यात आता त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. भविष्यात यात आणखी गतीने वाढ होईल आणि आकांक्षीत असलेला हा जिल्हा पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहणार नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या