प्रतिनिधी....शहाजी आगळे
आषाढी एकादशी निमित्त मेडसिंगा येथे २२ दिवस सलग भजन सोहळा संपन्न
देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांच्या व आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी प्रस्थान झाल्यापासून गावात भक्तिभावाचे वातावरण
मेडसिंगा (ता. धाराशिव ) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मेडसिंगा गावात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यापासून एकादशीपर्यंत सलग २२ दिवस दररोज सायंकाळी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या भजन सोहळ्याला गावातील महिलांनी व पुरुषांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या काळात दररोज संध्याकाळी ग्रामस्थ एकत्र येऊन वारकरी परंपरेतील अभंग, भजने, गवळण व गजर सादर करत होते. या निमित्ताने गावात एक वेगळाच भक्तिपारायण आणि सामुदायिक वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून करण्यात आली. गावातील प्रमुख मंडळी, भजनी मंडळ आणि वारकरी भक्त यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच नामस्मरणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
एकादशीच्या दिवशी विशेष भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्वच वयोगटातील नागरिकांनी यात सहभाग घेतला.
या २२ दिवसांच्या अखंड भजनाच्या कार्यक्रमामुळे गावात अध्यात्मिक उर्जा आणि सामाजिक एकोपा वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.हा भजन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ, युवक मंडळ आणि महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या