प्रतिनिधी...प्रतीक वाघे
प्रतिनिधी.... प्रप्रतिनितीक वाघे
धाराशिव जिल्ह्यातील ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट अनुदान द्यावे
मानवी हक्क अभियानची शासनाकडे मागणी
मे महिन्यापासून झालेल्या अवकाळी व सततच्या पावसाच्या कहरामुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले असून शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. उपजीविकेचा प्रश्न बिकट झाल्याने शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मानवी हक्क अभियानतर्फे करण्यात आली आहे.
अभियानच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनाम्याच्या प्रक्रियेशिवाय शेतकऱ्यांना सरसकट अनुदान वितरीत करण्यात यावे. शेतकरी आधीच कर्जबाजारी झाल्याने सततच्या संकटामुळे आत्महत्यांना प्रवृत्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शासनाने त्वरीत निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी सक्षम राहिल्यासच देशाच्या तसेच जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य निर्माण होईल, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. शेतकरी हा अन्नदाता आहे, तो जगला पाहिजे हा विचार शासनाने करणे गरजेचे असल्याचे मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष कैलासभाऊ पवार, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे व जिल्हा कार्यसंघटक खालीद पटेल यांनी स्पष्ट केले.
अनुदान तात्काळ मंजूर न झाल्यास शेतकरी संघटनांना न्यायहक्कासाठी आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.




0 टिप्पण्या