प्रतिनिधी...मनोज जाधव
तुळजापूर : मुसळधार पावसाने तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव, कुणसावळी व आसपासच्या गावांमध्ये मोठे नुकसान केले आहे. अनेक कुटुंबांची घरे पडझड झाली असून काहींच्या घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या काळात तुळजापूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी पीडितांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली "अनाथाचा नाथ एकनाथ" या घोषवाक्याच्या अनुषंगाने पूरग्रस्त कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे पीडितांना तात्पुरता दिलासा मिळाला असून संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना अमोल जाधव यांनी सांगितले की, “शिवसेना सदैव जनतेच्या सोबत आहे. प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात आम्ही लोकांसोबत खंबीरपणे उभे आहोत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
जाधव यांनी गावांची पाहणी करताना धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली असून पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळेल, याची ग्वाही त्यांनी दिली.
या मदतकार्यावेळी युवा नेते शहाजी हाके,गणेश नेपते,स्वप्निल सुरवसे,पांडुरंग शिंदे,अंकुश रूपनर,राहूल शिंदे यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांना अन्नधान्य व किराणा साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला.
सध्या मुसळधार पावसाचा तडाखा बसलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाकडून तत्काळ मदत आणि पुनर्वसन अपेक्षित आहे.






0 टिप्पण्या