प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर : - दि 30 सप्टेंबर रोजी - श्रमाला फळ मिळते असे म्हटले जाते मात्र प्रत्येकात श्रम करण्याची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. एखादे काम करतो मात्र त्यात यश अपयश मिळाले तरी त्यात सातत्य पाहिजे. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी प्राविण्य मिळवतात ते कमी दिवसाची मेहनत नसते त्याचा सातत्याने सराव करणे महत्त्वाचे आहे. क्रीडा क्षेत्रात जसे सातत्य महत्त्वाचे तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षेची चांगली तयारी केली तर चांगले यश मिळते. आपण हे करू शकतो की नाही हा विचार करण्यापेक्षा धाडसाने कार्याला लागणे महत्त्वाचे आहे. आपली परिस्थिती प्रगतीसाठी अडथळा ठरत नाही. आहे त्या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा मार्ग शोधला पाहिजे. आपण हे करू शकतो हा विचार करताना आपल्यातील क्षमता आपण ओळखली पाहिजे असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे तलवारबाजी स्पर्धेमध्ये राज्यात अव्वल व राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिद्धांत संतोष विधाते याची निवड झाल्यामुळे मा श्री नागेश मापारी (प्राथमिक शिक्षणाधिकारी, धाराशिव ) यांच्या हस्ते सत्कार समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
महाराष्ट्र असोसिएशन व भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन द्वारा आयोजित दिनांक 26 ते 28 सप्टेंबर 2025 रोजी 33 वी ज्युनिअर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा भंडारा येथे संपन्न झाल्या होत्या. त्यात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. सिद्धांत विधाते याने तलवारबाजी मधून हे यश संपादन केले. त्याला या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे. राष्ट्रीय पातळीवर उत्तराखंड येथे पुढील स्पर्धा पार पडणार आहेत. सिद्धार्थ संतोष विधाते व हर्ष कदम यांना तलवारबाजी फाईल मधून महाराष्ट्र सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते. प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी सिद्धांत विधाते याने महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवर त्याची निवड झाली त्याचे गुपित आपण लक्षात घेतले पाहिजे. यश संपादन करण्यासाठी सराव सातत्याने केला पाहिजे. त्याने या स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी सरावात सातत्य, जिद्द, चिकाटी ठेवली तेव्हा विद्यालयाचा, गावाचा व राजाचा नावलौकिक भर घालु शकाला. याप्रमाणे आपण ही असे कार्य करून दाखवावे व नावलौकिक करावा अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशांत कोळगे व अश्विन कुमार पवार यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, लक्ष्मण कांबळे, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे तर आभार श्री गणेश शेटे यांनी केले.


0 टिप्पण्या