Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तुळजाभवानी मंदिर परिसरातील अतिक्रमण व धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाईची शिवसेनेची मागणी


 


        प्रतिनिधी....मनोज जाधव 


तुळजापूर – महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील स्वच्छता,शिस्त आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक यांना तुळजापूर शहर शिवसेनेचे उपशहरप्रमुख रमेश चिवचिवे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून,मंदिरासमोरील अतिक्रमण हटवणे आणि दर्शन मंडप व धर्मदर्शन हॉल परिसरात धूम्रपान करणाऱ्या पुजारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


या निवेदनात म्हटले आहे की,मंदिराच्या महाद्वारासमोर दोरेवाले,बांगडेवाले आणि भिक्षुक यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे,ज्यामुळे भाविकांना दर्शनासाठी येताना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी भाविकांची चोरी,पाकीटमारीसारखे प्रकार वाढल्याने मंदिर परिसरातील पवित्रता आणि भाविकांचा विश्वास धोक्यात आला आहे.त्यामुळे या सर्व अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून परिसर मोकळा करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच,दर्शन मंडपामध्ये पेड पास काउंटर आणि धर्मदर्शन हॉल परिसरात काही पुजारी आणि कर्मचारी धूम्रपान करतात व थुंकतात,यामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता निर्माण होते आणि भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.हे वर्तन अत्यंत गैरसोयीचे असून मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारच्या कृतींना जागा नाही,असे शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


शिवसेनेच्या या निवेदनात मंदिर संस्थान प्रशासनाने तात्काळ पावले उचलून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,तसेच मंदिर परिसरात “स्वच्छता व शिस्त राखा” अभियान हाती घ्यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.


या निवेदनावर तुळजापूर शहर शिवसेना उपशहरप्रमुख रमेश चिवचिवे,संजय लोंढे,संभाजी नेपते,बबलू कदम यांच्या स्वाक्षरी असून,शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.


भाविकांच्या सोयीसाठी व मंदिराच्या पवित्रतेच्या जपणुकीसाठी करण्यात आलेल्या या मागणीला स्थानिक नागरिक व भाविक वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत असून,आता मंदिर संस्थान प्रशासनाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या