दसरा-दिवाळी पूरग्रस्तांसोबत – सामाजिक बांधिलकीचा संकल्प
प्रतिनिधी...मनोज जाधव
“मदत नव्हे, हे आपले कर्तव्य आहे” या भावनेतून तुळजापूर येथील प्रहार दिव्यांग संघटना टीम तसेच लोकमान्य युवा मंच, अयोध्या नगर यांच्या वतीने विजयादशमीच्या शुभदिनी अतिवृष्टीमुळे प्रभावित कुटुंबांना भेट देत अन्नधान्याचे फूड किट वाटप करण्यात आले.
पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना त्यांच्या घरच्या घरी जाऊन भेट देत त्यांच्या दुःखात सहभागी होत कार्यकर्त्यांनी आपुलकीचा हात दिला. या वेळी गावकऱ्यांच्या गरजांची जाण ठेवत फूड किटचे वाटप करण्यात आले. यामुळे सणाच्या दिवशी संकटग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आयोजकांनी सांगितले की, “दसरा हा विजय, आनंद आणि ऐक्याचा सण आहे. मात्र ज्यांच्यावर निसर्गाच्या आपत्तीचे संकट कोसळले आहे, त्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यंदाचा दसरा-दिवाळी आम्ही पूरग्रस्तांसोबत साजरा करण्याचा संकल्प केला आहे. ही मदत नसून सामाजिक बांधिलकी आहे,” असे स्पष्ट केले.
धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून अनेक कुटुंबे अजूनही अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदतीचा हात देणे हीच खरी विजयादशमीची प्रतिज्ञा असल्याचे आयोजकांनी नमूद केले.





0 टिप्पण्या