शिवसेना पक्षाची सिंदफळ जिल्हा परिषद गटाची बैठक उत्साहात संपन्न
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले
तुळजापूर प्रतिनिधी ....मनोज जाधव
तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे विशेष महत्त्व असून,पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच निवडणुकीच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव,तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,तसेच शहर संघटक नितीन मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.सिंदफळ जिल्हा परिषद गटातील सर्व शाखा प्रमुख,पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
या बैठकीत तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी आगामी निवडणुका शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,पक्षाचे सचिव संजय मोरे,उपनेते ज्ञानराज चौगुले,जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये स्वबळावर लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की,“प्रत्येक ग्रामपातळीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे.पक्षाने दाखविलेल्या मार्गावर ठाम राहून मतदारांशी संपर्क साधा.”
शहर प्रमुख बापूसाहेब भोसले यांनी पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यावर भर देत,गटातील प्रत्येक शाखेने कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवावा असे आवाहन केले. तर नितीन मस्के यांनी निवडणूक तयारी,बूथनिहाय जबाबदाऱ्या आणि मतदारसंघ पातळीवरील नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीनंतर गटामध्ये शिवसेनेच्या जोरदार तयारीमुळे विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगली.स्थानिक स्तरावर शिवसैनिकांचा वाढता उत्साह आणि संघटनेची वाढती ताकद पाहता आगामी निवडणुकीत सिंदफळ गटातून शिवसेनेचा झेंडा फडकणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



0 टिप्पण्या