धाराशिव सैनिक मुलांचे वस्तीगृह महाराष्ट्रात ‘नंबर वन’ करण्याचा निर्धार
कर्नल शरद पांढरे यांची जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकाऱ्यांना सदिच्छा भेट; नूतनीकरण प्रस्तावास मंजुरीबद्दल आभार
📰 धाराशिव | प्रतिनिधी. मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यातील सैनिक मुलांच्या वस्तीगृहाच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याबद्दल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आदरणीय कर्नल शरद पांढरे यांनी आज जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी धाराशिव यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील सैनिक मुलांचे वस्तीगृह अत्याधुनिक व उच्च दर्जाचे करण्याची ग्वाही दिली. तसेच या वस्तीगृहाचे नूतनीकरण करून ते महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे सैनिक मुलांचे वस्तीगृह बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असलेले सैनिक मुलांचे वस्तीगृह सध्या अत्यंत सुनियोजित, शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने चालवले जात असून येथे मिळणारी राहण्याची व जेवणाची सुविधा खासगी वस्तीगृहांपेक्षा अधिक दर्जेदार आहे. विशेष म्हणजे, या उच्च दर्जाच्या सुविधांनुसार खर्च अत्यंत कमी असल्याचेही सांगण्यात आले.
माजी सैनिकांच्या पाल्यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल, मात्र त्या नंतर जागा शिल्लक राहिल्यास इतर नागरिकांच्या मुलांनाही या वस्तीगृहात प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
सैनिक कुटुंबीयांसाठी एक आदर्श व विश्वासार्ह शैक्षणिक आधार केंद्र म्हणून धाराशिव जिल्ह्यातील सैनिक मुलांचे वस्तीगृह उभे राहत असून, येणाऱ्या काळात त्याचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.


0 टिप्पण्या