प्रतिनिधी...मनोज जाधव
तुळजापूर-लातूर उडाणपूल कामासाठी अवैध मुरूम उत्खनन प्रकरणावर कारवाईची मागणी
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन – ३१ ऑगस्टला मंत्रालयात बैठक
तुळजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील तुळजापूर-लातूर मार्गावर मौजे काक्रंबा येथे सुरू असलेल्या उडाण पूलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम (गौण खनिज) उत्खनन करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी केला आहे. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर निवेदन देऊन तात्काळ चौकशीसह संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की —
परवान्यापेक्षा जास्त उत्खनन : परवाना केवळ ८ ते १० हजार ब्रास मुरूम उत्खननासाठी असून, प्रत्यक्षात ५० हजार ब्रासपेक्षा अधिक उपसा झाल्याचे दिसते.
ठिकाण बदलून उत्खनन : परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राऐवजी दुसऱ्याच ठिकाणाहून मुरूम उपसा केला जात आहे.
पिकविमा घेतलेल्या जमिनीवर परवाना : परवाना असलेल्या गटावर मागील वर्षी पिकविमा भरला असून त्याचा लाभही घेतला आहे.
आवश्यक विभागांची ना हरकत न घेता काम : वन, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची परवानगी न घेता उपसा; तसेच GPS प्रणाली न बसवता आणि रात्रीच्या वेळी नियम मोडून काम.
खोट्या कागदपत्रांचा वापर : शेतकऱ्याची नाहरकत मिळवण्यासाठी खोट्या कागदपत्रांवर आधारित पंचनामा व चुकीचा अहवाल महसूल यंत्रणेकडून.
अधिकाऱ्यांचा संगनमताचा आरोप : तलाठीपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व महसूल अधिकाऱ्यांचा संगनमताने सहभाग, चुकीचे सातबारा, खोट्या सह्या, बोगस नाहरकतपत्रे जोडणे यांसारखे गंभीर प्रकार.
या अवैध उत्खननामुळे शासनाला करोडो रुपयांचे नुकसान झाले असून, दोषींवर तात्काळ कारवाईसह ठेकेदाराकडून दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना शैलीत आंदोलनाचा इशाराही तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी दिला आहे.
या आधी काही महिन्यांपासून स्थानिक पत्रकारांनी हा मुद्दा उचलून प्रशासनाच्या समोर ही बाब लक्षात आणून दाखवली होती पण प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही व कोणतेही चौकशी केली नाही असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
तसेच अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाचे निवेदन दिल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली जाईल असे सांगितले. तसेच येत्या ३१ ऑगस्ट रोजी मंत्रालयात विशेष बैठक घेऊन पुढील निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे या प्रकरणात आता काहीतरी ठोस कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत.
0 टिप्पण्या