📰 कोट गल्लीतील चांगल्या रस्त्यांचे काम करू नये; निधी इतर विकासकामांसाठी वापरण्याची मागणी
👉 ॲड. विश्वजीत शिंदे यांचे नगरपरिषदेला निवेदन
धाराशिव | प्रतिनिधी. मनोज जाधव
धाराशिव शहरातील कोट गल्ली परिसरातील रस्ते सध्या चांगल्या व सुस्थितीत असल्याने तेथे नव्याने रस्ते दुरुस्ती अथवा बांधकाम करण्याची कोणतीही गरज नाही, त्यामुळे सदर रस्त्यांसाठी नियोजित असलेला निधी शहरातील इतर आवश्यक विकासकामांसाठी वापरण्यात यावा, अशी कळकळीची मागणी ॲड. विश्वजीत विजयकुमार शिंदे यांनी धाराशिव नगरपरिषदेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात ॲड. शिंदे यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा, नगरपरिषद धाराशिव यांना निवेदन दिले असून, कोट गल्लीतील रस्ते हे सध्या सिमेंट काँक्रीट व फेवर ब्लॉकमध्ये चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
⚖️ न्यायालयीन आदेशानुसार झालेले रस्ते आजही सुस्थितीत
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, कोट गल्ली व सांजावेस गल्लीतील रस्त्यांचे काम हे रस्ते प्रकरण क्र. १/२०१७ अंतर्गत धाराशिव न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आले होते. त्या वेळी बांधलेले रस्ते टिकाऊ व दर्जेदार असून आजही चांगल्या स्थितीत आहेत. अशा रस्त्यांवर पुन्हा काम केल्यास नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागेल.
🏠 रस्त्यावर रस्ता केल्याने घरे जमिनीखाली जाण्याची भीती
पूर्वी रस्त्यावर पुन्हा रस्ता बांधण्यात आल्याने अनेक नागरिकांची घरे व दुकाने मूळ जमिनीच्या पातळीपेक्षा खाली गेली आहेत, अशी गंभीर बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा असे काम झाल्यास नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
🚧 माऊली चौकातील उभाटा दुरुस्त करण्याची मागणी
माऊली चौकातून कोट गल्लीमध्ये प्रवेश करताना श्री. पंकज जयंतराव पाटील यांच्या घराजवळ रस्त्यावर निर्माण झालेला उभाटा केवळ दुरुस्त करण्यात यावा, कारण त्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
💰 निधीचा योग्य वापर करण्याचे आवाहन
“शासनाचा निधी हा सर्वसामान्य जनतेच्या करातून जमा झालेला पैसा आहे. त्यामुळे अनावश्यक ठिकाणी खर्च न करता ज्या भागात खरोखर रस्त्यांची गरज आहे, तेथेच निधी खर्च करण्यात यावा,” असे आवाहन ॲड. शिंदे यांनी नगरपरिषदेला केले आहे.
📸 पुराव्यासाठी फोटो जोडले
कोट गल्लीतील रस्ते सध्या चांगल्या स्थितीत असल्याचे दर्शवणारे फोटो पुराव्यासाठी निवेदनासोबत जोडण्यात आले आहेत.
ℹ️ माहितीस्तव प्रती पाठविण्यात आल्या
या निवेदनाच्या प्रती —
मा. जिल्हाधिकारी, धाराशिव
मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक, पालकमंत्री धाराशिव जिल्हा
मा. ना. श्री. कैलासजी पाटील, आमदार धाराशिव
मा. खा. श्री. ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर, खासदार धाराशिव
यांना पाठविण्यात आल्या आहेत.
#नगरपालिका प्रशासन
#रस्ते विकास


0 टिप्पण्या