प्रतिनिधी...मनोज जाधव
धाराशिव- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे शनिवार, ७ जून रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी भाजप कार्यालय, प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य पाटील, ॲड. नितीन भोसले, ॲड. मिलिंद पाटील, अनिल काळे, नेताजी पाटील, विनोद गपाट, अस्मिता कांबळे, नंदाताई पुनगुडे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मत्स्य विभागाला दिलेल्या निवेदनाचा दाखला देत धाराशिव जिल्ह्यातील जलस्रोतांचा उपयोग मत्स्य व्यवसायासाठी प्रभावीपणे व्हावा यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्ह्यात २२६ जलप्रकल्प, तलाव व जलसंधारण साधनांमुळे मत्स्य व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध आहे. याचा वापर करून जिल्ह्यात बीज प्रक्रिया केंद्रे, प्रशिक्षण सुविधा, आणि कोल्ड स्टोरेज व्यवस्था निर्माण करावी. याबरोबरच ‘येरमाळा स्पेशल मच्छी’सारख्या स्थानिक ब्रँडचे उदाहरण देत त्यांनी त्याला बाजारपेठ मिळावी यासाठी पाठबळ देण्याचे आवाहन केले.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना नितेश राणे म्हणाले, “माझ्या खात्याच्या माध्यमातून जी मदत शक्य आहे ती हक्काने मागा. तुमचा मागणीचा ड्राफ्ट द्या, आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल, ते मी स्वतः पाहीन.” ते पुढे म्हणाले, “माझी पहिली ओळख भाजप कार्यकर्त्याची आहे, मंत्रीपद ही त्यानंतरची भूमिका आहे. मी इथे फक्त दौऱ्यासाठी नाही, तर संघटनात्मक संवाद साधण्यासाठी आलो आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजपचं कमळ शेवटच्या घरोघरी फुललं पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे. कार्यकर्ता संवादाच्या माध्यमातून स्थानिक विकास आणि संघटनात्मक बळकटी या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.


0 टिप्पण्या