तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बोगस खतनिर्मितीचा कारखाना बंद करण्याची मागणी
अधिकार्यांचा छापा तरीही कारखाना उघडाच,
संबंधित अधिकाऱ्यांवर होतोय संशय व्यक्त
तामलवाडी प्रतिनिधी ...सचिन शिंदे
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सर्वे नं ३९९ मध्ये गेली वर्षभरापासून बोगस खतनिर्मितीचा कारखाना खुलेआम सुरू असुन तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी केली जात आहे.
सध्या शेतकर्यांची परिस्थिती फारच बिकट बनली आहे. अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी कसाबसा शेती वाचवण्याचा प्रयत्न करत असताना बोगस बियाणे,खते, औषधे देऊन शेतकर्यांची फसवणुक होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सर्वे नं ३९९ मध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बोगस खतनिर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले असुन तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करावा आशा आशयाची मागणी जिल्हाधिकारी सह संबंधित अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कारखाना एक नावे मात्र दोन
---------------------------------------------
हा खतनिर्मितीचा कारखाना तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायझर या नावाने असल्याचा फलक दिसुन येत आहे मात्र पत्र्याच्या शेडच्या समोरील बाजूस महींद्रा क्राॅप सायन्सेस नावाचा दुसरा फलक दिसुन येत असल्याने नेमका कारखाना चालतोय कुठल्या नावाने? असा प्रश्न उपस्थित होतो.
👉 कारखान्यात सोयीसुविधांचा अभाव
---------------------------------------------
या खतनिर्मितीच्या कारखान्यात किंवा बाहेरील बाजूस कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले दिसत नाहीत, त्याठिकाणी कुठलीही सुरक्षा यंत्रणा दिसुन येत नाही, सर्व परप्रांतीय कामगार तिथे विनासुरक्षा काम करत असल्याचे प्रत्यक्षात दिसुन आले.
👉 मागील वर्षी जुलै महीन्यात छापा टाकुन जवळपास ६ लाखाचा मुद्देमाल केला होता जप्त
---------------------------------------------
मागील वर्षी जुलै महीन्यात याच पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकुन खतांच्या ४०० गोण्या जप्त करुन तब्बल ६ लाख रुपये किमतीचा माल जप्त केला होता व संबंधित मालकावर तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
👉 गुन्हा दाखल असताना केवळ दोन महीन्यातच पुन्हा खतनिर्मिती व विक्री सुरू
---------------------------------------------
या खतनिर्मितीच्या कारखान्यावर व संबंधित मालकावर गुन्हा दाखल असताना सप्टेंबर २०२४ मध्ये ग्रामपंचायत तामलवाडी येथून संबंधित मालकाने खतनिर्मितीसाठी नाहरकत मिळवले व तसा ठरावही संमत करुन घेतला. परंतु आजतागायत त्या जागेची ग्रामपंचायतीच्या ८ अ ला नोंद नाही हे विशेष. आजही सर्वे नं ३९९ या जागेचा ७/१२ आहे. आणि त्यावर सदरील मालकाचे नाव आहे.
👉 सदरील खतनिर्मितीच्या कारखान्यात लॅबोरेटरीची व्यवस्था नाही
---------------------------------------------
ज्या कारखान्यात खतनिर्मिती केली जाते त्याठिकाणी सदरील खताची क्वालिटी चेक करण्यासाठी कुठेही लॅबोरेटरी दिसुन आली नाही.
👉 खतनिर्मितीच्या प्रक्रियेसाठी हजारो टन लकाकडाचा वापर, पर्यावरणाची मोठी हानी
---------------------------------------------
सदरील खतनिर्मिती साठी किंवा त्याठिकाणी असलेल्या बायलरसाठी मोठ्या प्रमाणात हजारों टन लाकडाचा वापर केला जातोय. एकीकडे धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी १९ लाख वृक्षलागवड करुन जागतीक विक्रम केला तर दुसरीकडे मात्र झाडांची कत्तल करून पर्यावरणाची हानी करून हजारो टन लाकुड या ठिकाणी आणले जातेय ते कुठुन आणले जातेय याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी साहेब व संबंधित अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर कारखाना सिल
---------------------------------------------
हा खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करणेबाबत जिल्हाधिकारी साहेब व संबंधित अधिकारी यांना निवेदन सादर केल्यानंतर संबंधित अधिकारी यांनी छापा टाकुन कारखाना सिल केल्याचे सांगितले परंतु प्रत्यक्षात मात्र कारखाना उघडाच असल्याचे आढळून आले.
संबंधित अधिकार्यांची भुमीका संशयास्पद
---------------------------------------------
या कारखान्यावर छापा टाकुन कारखाना बंद केल्याचे जरी संबंधित अधिकारी यांच्याकडून सांगितले जात असले तरी सदरील कारखाना उघडाच असल्याचे दिसून आले. त्याबाबत काही गोष्टी संबंधित अधिकारी यांच्याकडे पोहचवल्याही परंतु त्याच गोष्टी कारखान्याच्या मालकाकडे जात असल्याने जिल्ह्यातील संबंधित अधिकार्यांची कारवाई ही संशयास्पद असल्याचे दिसून येत असुन संबंधित मालक व अधिकारी यांचे लागेबांधे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
राज्यात असेच बोगस खताचे कारखाने सुरू राहील्यास व त्यास जिल्ह्यातील अधिकार्यांचे अभय मिळाल्यास हीच बोगस खते घेऊन राज्यातील शेतकरी रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही.
मा मंत्रीमहोदय यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
---------------------------------------------
राज्यातील अशा बोगस खतनिर्मितीच्या कारखान्यावर कठोर कारवाई करुन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व अशा गोष्टींकडे मा मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब, कृषीमंत्री साहेब यांनी अशा थातुर मातुर कारवाया करुन शेतकर्यांचे कधीही न भरुन येणारे नुकसान करणार्या संबंधित कारखानदाराला अभय देणार्या संबंधित अधिकारी यांच्याकडेही लक्ष द्यावे व बोगस खतनिर्मिती करुन राज्यातील शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवणार्या अशा कारखान्यावर कारवाई करुन ते कायमस्वरूपी बंद करावेत व बिकट परिस्थितीचा सामना करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या