📰 मनोबल वाढवणारी मागणी! श्री तुळजाभवानी मंदिरातील स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्या – मनसेची तहसीलदारांकडे मागणी..
प्रतिनिधी....मनोज जाधव
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात ट्रेडरमार्फत कार्यरत स्वच्छता व सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळी सणानिमित्त बोनस देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार तथा प्रशासन व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे, निष्ठेने व जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत मंदिर परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेसाठी या कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, “हे कर्मचारी अत्यल्प वेतनावर सेवा बजावत असून, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांनाही दिवाळी बोनस देण्यात यावा. या बोनस रकमेने त्यांच्या कुटुंबाचा सण आनंदात साजरा होईल तसेच कर्मचाऱ्यांना कामाचा उत्साह मिळेल.”
मनसेने प्रशासनाकडे मानवी दृष्टिकोनातून विचार करून स्वच्छता व सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना योग्य ती बोनस रक्कम तत्काळ देण्याची मागणी केली आहे.


0 टिप्पण्या